शिवशाहीरांना श्रद्धांजली

प्रासंगिक आणि व्यक्तिगत.

शिवशाहीर बमो पुरंदरे वारले. त्यांना ओम् शांती.
माझ्या नजीक, फेसबुक वॅालवर नुसता पूर लोटलाय. श्रद्धांजलींचा व तितकाच, निर्भर्त्सना करणार्या लिखाणाचा.

शिवाजी महाराजांबद्दल आमच्यासाठी प्रमाण पुस्तक होतं, त्यांनी लिहीलेलं शिवचरित्र.
त्याची पारायणे केली होती, पन्नास एक वर्षांपूर्वी. नंतर संपर्क मिटला त्या शैलीतील लिखाणाशी.
त्यांच्या कुटुंबियांच्या व चाहत्यांच्या दु:खात अनेक सहभागी असणार.

वयाच्या योग्य (apt) स्थळी कुरुंदकरांचे लेखन वाचले, व perspective, context व अर्थ कळला इतिहासाचा.

ज्या विषयाचा किंचित तरी खोल अभ्यास आहे, तोही अद्ययावत, तरच लिहावे.
असं जर प्रमाण मानलं तर अवघड आहे.

सोपं कधीच नव्हतं, नसतं व नसेल.
इतिहासाची छानबीन करणे, त्यावर प्रकाश (सतत) टाकत रहाणे. आपल्या अंधार्या नेणीवेतली वटवाघळे हुसकावून लावणे, निव्वळ स्वत:साठी. कंपू वा गर्दीसाठी नाही.
आधुनिक वैद्यकशास्त्रात मुंगीएव्हडा तरी अभ्यास केला असल्यामुळे, या अभ्यासाची कल्पना आहे.

ती वृत्ती जोपासणे, हे वाण- आपल्याला का शिकवले जात नाही बालपणी?

धर्मांधता, जातीयवाद , भेदभाव, द्वेष, मत्सर, या चलनी नाण्यांचा त्याग करायला शिकवणार्या माझ्या काही मार्गदर्शकांना नमस्कार.


१५ नोव्हेंबर २०२१.

————————————————————————————————————

इतिहासकार आणि शिवशाहीर पुरंदरे गेले. बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या.
४० वर्षांपूर्वीची गोष्ट पण पुरंदरे लिखित शिवचरित्र घरी नाही असा मराठी माणूस पाहण्यात आला नाही तेंव्हा.
घरातील दुसऱ्या कुठल्याही पुस्तकाची इतकी पारायणे केल्याचे आठवत नाही.

‘जाणता राजा” कधी बघितला नाही, काही गरजच वाटली नाही.
ओघवत्या लिखाणातून शिवरायांची त्यांनी जी सार्थ प्रतिमा उभी केली त्याला काय तोड असणार?
ह्या मानवधर्मी राजाच्या प्रदेशात जन्म झाला हे नशीब.

९९ वर्षांचं समृद्ध जीवन.
लक्षावधी लोकांना शिवचरित्र लिहून प्रेरणा दिली.
जी. ए. च्या भाषेत आरभाट माणूस.
आपण चिल्लर.

राजांनी धर्म पाहिला नाही, जात पात पाहिली नाही
फक्त स्वराज्यावरील निष्ठा पाहिली.
फक्त असेच ह्या शिवचरित्रात वाचले
आणि आचरणांत आणायचा प्रयत्न केला

पण,
शाहीरांसारखं १-२ वर्षे जगता आलं तरी जन्म सार्थक.

Leave a Reply