रिचर्ड डॉकिन्स : संध्याछाया दिपवती हृदया
भूषण निगळे , हेम्सबाख, जर्मनी
डॉकिन्स यांच्यासारखा आघाडीचा शास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रसारक जर या व्याधींपासून दूर राहू शकतो, तर सर्वसामान्य व्यक्तींनाही हे का शक्य असू नये ? घमेंडीचे रूपांतर उद्दामपणात आणि उद्दामपणाचे स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना खऱ्याच आहे या भ्रमात होते. याउलट, वैचारिक नम्रतेची आयुष्यभर साथ असली तर नवीन आव्हानांना सामोरे जायची शक्ती मिळते आणि स्वतःचा सर्वांगीण विकास करायची संधी. म्हणूनच अथकपणे कार्यरत असलेल्या, लौकिकार्थी वयोवृद्ध असलेल्या पण वृत्तीने चिरतरुण असलेल्या 82 वर्षांच्या व्यक्तीला ऐकायला चार पिढ्यांचे आणि अनेक देशा-वंशांचे लोक कुडकुडत्या थंडीत रांग लावून हजर राहतात आणि मग भाषणावर हिरिरीने चर्चा करतात. त्या चर्चातून काहींना पुढच्या दिशा शोधायचे सामर्थ्य मिळणार असते, काहींना ज्ञानाची कवाडे, तर काहींना स्वतःच्या मूल्यांशी नव्याने ओळख.
जगविख्यात संशोधक आणि विज्ञानप्रसारक रिचर्ड डॉकिन्स जर्मनीतल्या हायडलबर्ग या शहरात वर्षाअखेर एका प्रकट मुलाखतीसाठी येणार आहेत, असे जून 2023 मध्ये कळले तेव्हा मी हरखून गेलो. मी डॉकिन्स यांचा निस्सीम चाहता तर आहेच; पण हा विज्ञानविरोध त्यांना जाणवतो का आणि त्यावरील उपायांवर त्यांचे विचार जाणून घ्यायची उत्सुकता वाटली. त्यामुळे लगेचच त्यांच्या कार्यक्रमाचे तिकीट काढले आणि नोव्हेंबरची वाट पाहू लागलो.
डॉकिन्स यांच्या वैज्ञानिक कर्तृत्वाच्या दोन प्रमुखांची ओळख करून देणे सयुक्तिक ठरेल. त्यांच्या तरुणपणी डॉकिन्स डार्विनिअन उत्क्रांतिवादाचे संशोधक म्हणून प्रकाशात आले. अविरतपणे बदलणाऱ्या पर्यावरणाशी जुळवून घेताना सजीवांमध्ये होणारे बहुतेक बदल प्रतिकूल असतात. पण, काही बदलांमुळे सजीवांची पर्यावरणाशी अनुकूलता वाढते. जीवनकलहात जिंकणाऱ्या यशस्वी जिवांची गुणसूत्रे पुढील पिढीत पोहोचतात आणि यथावकाश या परिवर्तनांमुळे सजीवांच्या नवीन जाती तयार होतात. ‘यशस्वी सजीवांची निवड होणे प्रजाती किंवा सजीवांच्या पातळीवर होत नसून पर्यावरणीय बदलांशी जुळवून घेणाऱ्या सुट्टया गुणसूत्रांद्वारे होते’, हा सिद्धान्त डॉकिन्स यांच्या संशोधनामुळे प्रस्थापित व्हायला मदत झाली. सुट्टया गुणसूत्राला आपल्या प्रती काळात टिकून राहत फक्त आपला स्वार्थ साधायचा असतो. सभोवतालचे प्राणिजन्य शरीर हे निव्वळ वाहन असते, ही संकल्पना सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवायला डॉकिन्स यांनी ‘द सेल्फिश जीन’ (1976) हे पुस्तक लिहिले.
‘द सेल्फिश जीन’ प्रकाशित झाले त्या वेळी डॉकिन्स फक्त पस्तिशीचे होते. पुस्तक प्रचंड गाजले ‘वाचलेच पाहिजे’ अशा पुस्तकांच्या यादीत ‘द सेल्फिश जीन’चा समावेश होतो. हे पुस्तक अनेक वाचकांना क्लिष्ट वाटू शकते. मात्र, पुस्तकाच्या शेवटी मांडलेली ‘मीम’ ही संज्ञा मात्र आता बहुतेकांच्या ओळखीची झाली आहे. स्वतःच्या प्रती यशस्वीपणे काढणारी यंत्रणा सजीवच असावी लागत नाही. अशारीर कल्पनासुद्धा एका मेंदूतून दुसऱ्या मेंदूत शिरते तेव्हा तिची प्रत निघते. कल्पना मूळ एकक असते, आजूबाजूचा मेंदू नुसते प्रसारणाला मदत करणारे वाहन असतो. म्हणूनच विचार, कल्पना, आचार, व्यक्ती-समूह-जमातींत मेंदूंद्वारे पसरतात, यशस्वी कल्पना शेकडो हजारो वर्षे टिकून राहणाऱ्या समूहांत स्थिरावतात आणि कालमानाने त्यांच्या आवृत्त्या उत्क्रांत होतात. मग त्या धर्म-भांडवलशाही लोकशाहीसारख्या जगद्व्याळ व्यवस्था असोत, किंवा समाजमाध्यमांवरून फिरणाऱ्या शॉर्ट्स असोत, किंवा व्हायरल केल्या जाणाऱ्या आयटीसेलप्रणीत द्वेष-कुजबुज मोहिमा असोत. (वैज्ञानिक उपमा वापरत असे म्हणता येईल की, जसे विषाणू एका सजीव जातीतून दुसऱ्या जातीत ‘उडी’ मारतात, तशीच झेप ‘मीम’ या संकल्पनेने विज्ञानातून लोकप्रिय संस्कृतीत घेतली आहे. )
वयोमानानुसार डॉकिन्स लेखक आणि त्यांच्या प्रतिष्ठानाद्वारे विज्ञान प्रसारक या भूमिकेत स्थिरावले. आजवर त्यांची 11 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘मायकल फॅरेडे पुरस्कार’ आणि ‘डेशनर पारितोषिक ‘सारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी निरीश्वरवादाचा पुरस्कार करत धर्मसंस्थेवर धारदार हल्ला चढवला आहे. जाज्वल्य विज्ञाननिष्ठा आणि प्रखर विवेकवाद ही जीवनमूल्ये आचरणात आणताना धर्ममार्तंड तसेच देवाला मानणारे वैज्ञानिक यांच्याशी त्यांची जाहीर खडाजंगीही झाली आहे. ‘द गॉड डिल्युशन’ आणि ‘ओवरग्रोव्हिंग गॉड’ या पुस्तकांतील त्यांची निरीश्वरवादी भूमिका अनेकांना टोकाची वाटते आणि काही विधानांमुळे ते अडचणीतही सापडले आहेत.
भावना दुखावून घेण्याचा रोग जर्मनीला कमी प्रमाणात जरी जडला असला, तरी या बदललेल्या मनूत हायडलबर्गसारख्या उदारमतवादी, तत्त्वज्ञानाची दीर्घ परंपरा लाभलेल्या शहरातही डॉकिन्स यांना विरोध होऊ शकतो. त्यामुळे आजची त्यांची मुलाखत निर्धोकपणे पार पडेल का, अशी शंका मनात आली. काहीशा संभ्रमित मनोवस्थेत मी हायडलबर्ग विश्वविद्यालयाच्या ‘आउला’ सभागृहासमोर आलो. वेळेच्या आधी अर्धा तास पोहोचूनही प्रवेशद्वारासमोरची रांग लांबली होती. आज काही विरोधक त्यांच्याविरुद्ध प्रदर्शन करतील असे वाटतेय, असे मागच्या बाईनी म्हटल्यानंतर साशंकता अजूनच वाढली. भरलेल्या सभागृहात मागच्या रांगेतील एक खुर्ची अजून रिकामी होती, ती ओढून डॉकिन्स यायची वाट पाहू लागलो.
माझी काळजी काही मिनिटांतच दूर झाली. ‘उडणे’ या वरकरणी अशक्य वाटणाऱ्या तंत्राचा शोध उत्क्रांतीने अनेक वेळा कसा लावला आहे याचे रोचक वर्णन त्यांनी केले. उडी मारणाऱ्या सरड्यांपासून ते भक्ष्यावर झेपावणाऱ्या सापांना जमिनीपासून क्षणकाल तरी वर जाण्याचा फायदा मिळाल्यामुळे त्यांना जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहायची क्षमता कशी मिळाली, याचे विवेचन त्यांनी केले. आजची त्यांची प्रकट मुलाखत ‘फ्लाइट ऑफ फॅन्सी’ या त्यांच्या नवीन पुस्तकासंबंधी होती, म्हणून, डॉकिन्स यांनी मुलाखतीत धर्मावर टोकदार विधाने केली नाहीत. धर्मभावना जगभर ओहोटीला जात आहे, याचा उल्लेख मात्र त्यांनी केला. धर्मविरोधाचा धागा पकडून मुलाखतकर्तीने त्यांना जगभरातल्या वाढत्या विज्ञानविरोधामागची कारणे विचारली. प्रश्न ऐकून डॉकिन्स अचंबित झाल्यासारखे वाटले. अमेरिकेतच नव्हे, तर तुर्कस्तान आणि भारत यांसारख्या लोकशाही देशांतही शाळांतून उत्क्रांतिवाद शिकवायचा बंद झाला आहे याकडे मुलाखतकर्तीने त्यांचे लक्ष वेधले.
संमतिदर्शक मान हलवून डॉकिन्स पुढे झुकले. धर्माचा अतिरेकी पगडा असलेल्या आणि अतिउजव्या राजकीय शक्ती वरचढ असलेल्या देशांत विज्ञानाला, विशेषतः उत्क्रांतिवादाला विरोध होतो हे त्यांनी मान्य केले. बायबलच्या अनुसार देवाने जग सहा हजार वर्षांपूर्वी निर्माण केले. धर्मग्रंथप्रामाण्य मानणाऱ्यांची संख्या अमेरिकेत मोठी आहे आणि या विशाल समूहाला चार अब्ज वर्षांपासूनचा क्रमविकास दर्शवणारा उत्क्रांतिवाद पाखंडी वाटतो. ज्या शाळांत तो शिकवला जातो त्या वेळी वर्गातील सश्रद्ध मुले निषेध दाखवत शिक्षकांपासून खुर्ची विरुद्ध दिशेला ठेवून कशी बसतात याचे वर्णन त्यांनी केले, तेव्हा हॉलमध्ये हळहळ पसरली.
मात्र, विज्ञानविरोध केवळ प्रतिगामी शक्तींकडूनच होतो असे मानणे गैर असल्याचे सांगत त्यांनी न्यूझीलंडमधील नवीन अभ्यासक्रमाचे उदाहरण दिले. न्यूझीलंडमध्ये गोऱ्या वसाहतवाद्यांनी मूळ रहिवासी असलेल्या माओरी जनतेवर अपरिमित अत्याचार केले. त्या कृष्णकृत्यांची थोडीशी सल आता न्यूझीलंडच्या जनतेला वाटते आणि त्याचा एक परिपाक म्हणजे तिथल्या शाळांत आता माओरी समजुती शिकवल्या जातात. विश्वाची उपपत्ती बिगबॅंगपासून कशी झाली हे शिकतानाच मुले आकाश आणि पृथ्वी या आई-वडिलांनी सृष्टी निर्माण कशी केली हेही शिकतात. मुलांवर या परस्परविरोधी गोष्टींमुळे ताण पडतो आणि ऐतिहासिक चुकांचे परिमार्जन वैज्ञानिक दृष्टिकोनाचा बळी देऊन करणे अयोग्य आहे हे त्यांनी ठणकावून सांगितले.
मुलाखतीचा एक तास संपला. प्रश्नकर्त्यांची मोठी रांग पाहून प्रत्येकाने एकच प्रश्न थोडक्यात विचारावा असे आवाहन आयोजकांनी केले. प्रत्येक प्रश्नकर्ती व्यक्ती प्रश्न विचारायच्या आधी तिला डॉकिन्स यांच्याबद्दल वाटणारा आदर व्यक्त करत होती. कुणाला त्यांच्यामुळे विज्ञान शिकायची इच्छा झाली, तर कुणाला धर्मसंस्था आणि देवाला नाकारण्याचे सामर्थ्य. कट्टरपंथी इस्लामी देशांतही इस्लामच्या पोथीनिष्ठ अंमलबजावणीविरुद्ध जनमत सुप्तपणे कसे वाढत आहे असे डॉकिन्स यांनी म्हटले होते त्या वेळी माझा विश्वास बसला नव्हता, पण इराण, इजिप्त, आणि सौदी अरबस्तानमधल्या काही प्रश्नकर्त्यांनी प्रश्न विचाराच्या आधी डॉकिन्स यांनी निरीक्षणाला पुष्टी दिली. त्या प्रश्नकर्त्यांना त्यांचे देश सोडून जावे लागले होते, तरीही भूमिगत राहून त्या व्यक्ती धर्मसंस्थेविरुद्ध लढत होत्या.
अपवाद एका प्रश्नकर्तीचा. न्यूझीलंडच्या माओरी जनतेवर वसाहतवाद्यांनी केलेल्या अत्याचारांचा उल्लेख करून बाईंनी डॉकिन्स यांना विचारले, “माओरी ज्ञानाला विरोध करणे हेसुद्धा वसाहतवादाचेच स्वरूप आहे असे तुम्हांला वाटत नाही का?”
थरथरणाऱ्या आवाजात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर डॉकिन्स यांनी संयतपणे दिले “पारंपरिक ज्ञान केवळ प्रथेने आले आहे म्हणून सत्य असत नाही. समजुतींना वैज्ञानिक निकषांची चाळणी लावून पारखणे आवश्यक ठरते. निरीक्षण करणे, कयास बांधणे, सिद्धान्त मांडणे, आणि उचित प्रयोगाद्वारे त्या आडाख्यांची सत्यता आजमावणे ही शृंखला-शिस्त पाळून जर या समजुती टिकल्या, तर वैज्ञानिक ज्ञानाचा त्या भाग ठरतील आणि मग त्यांचा विज्ञान म्हणून ते आनंदाने स्वीकार करतील. विज्ञान हे मानवी संचित आहे, त्याला पाश्चात्त्य विज्ञान किंवा आदिवासी-माओरी अशा पात्रसंज्ञा लावणे गैर आहे.”
उत्तरादाखल बाईंनी चढ्या आवाजात वसाहतवाद्यांनी माओरींच्या जमिनी कशा हडप केल्या याचे वर्णन केले. आयोजकांनी बाईंचे भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला, पण डॉकिन्स यांनी बाईना ‘बोलू द्यावे’ अशी खूण केली. मग त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली: माओरींवर झालेले अत्याचार गैर असून त्यांचा माओरींच्या राजकीय हक्कांना पूर्ण पाठिंबा आहे. पण ‘राजकीय हक्क’ आणि ‘वैज्ञानिक सत्य’ यांची गल्लत करण्याचा श्रेणीप्रमाद करू नये.
हॉलमधील चुळबुळ वाढत होती. बाईंनी माइक ठेवला आणि त्या सभागृह सोडून गेल्या. बाकीची प्रश्नोत्तरे सुरळीतपणे पार पडली. पाऊण तासापेक्षा जास्त वेळ प्रश्नोत्तरे रंगली आणि पंधरा-वीस प्रश्न तरी राहिले असताना वेळ संपल्यामुळे कार्यक्रमाची सांगता आयोजकांनी केली. तरीही, विज्ञानविरोधाचा प्रश्न कुठे तरी डॉकिन्स यांना डाचत होता असे वाटले, कारण समारोपादाखल त्यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. विज्ञान चालते, विज्ञान परिणाम देते, रोगांचा नायनाट करते, समृद्धी निर्माण करणारे तंत्रज्ञान तयार करते, मानवी क्षमता वृद्धिंगत करते. विज्ञानाची परिणामकारकता पटवावी लागते हे खेदाचे असले, तरी पुन्हापुन्हा सांगावे लागते. विज्ञान चालते. प्रत्येकाला वैज्ञानिक होणे शक्य नसते आणि ते आवश्यकही नाही. पण, विवेकावर विश्वास ठेवणे, दाव्यांची सत्यता पडताळायला पुरावे मागणे, घटनांमागचा कार्यकारण भाव शोधणे, आणि निरोगी कुतूहल जोपासणे हे सर्वांना शक्य आहे आणि सध्याची आव्हाने पाहता हे आपले कर्तव्य ठरते.
सभागृहात क्षणभर शांतता पसरली आणि मग टाळ्यांचा कडकडाट झाला. डॉकिन्स यांची स्वाक्षरी घेण्यासाठी व्यासपीठापासून दरवाजापर्यंत लांब पसरलेली रांग पाहता नुसते त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे दर्शन घेण्यात मी समाधान मानले. रांगेतल्या प्रत्येकाशी दोन शब्द बोलत हसतमुख डॉकिन्स पुस्तकांवर सही करत होते. काहीशा तृप्तीत मी सभागृहाबाहेर आलो आणि घराच्या दिशेने चालू लागलो.
तोंडावर थंड वारा झोंबू लागला आणि माझी धुंदी उतरली. विज्ञानाधारित मानवी प्रगतीबद्दल डॉकिन्स स्वप्नाळू वाटावेत इतके आशावादी वाटले. पण, प्रत्यक्षातील परिस्थिती कशी आहे? गेल्या काही वर्षांत विज्ञानविरोध मुख्य धारेत येऊन प्रतिष्ठित झाला. कोविड काळात ‘जीव गेला तरी बेहत्तर, पण लशींना विरोध करू’, या भूमिकेपासून ते अँटनी फौची यांच्यासारख्या वैज्ञानिक प्रशासकांना जीवे मारण्याची धमकी देणे या टोकापर्यंत हा विरोध गेला. कोविडकाळातील बंधने त्रासदायक होती आणि अनेकदा जगभर ह्या उपायांचा अतिरेक झाला हे खरे. पण, साशंकता वेगळी आणि हेकेखोर वृत्ती वेगळी. विज्ञानात सर्वोच्च, अंतिम मत असे काहीच नसते. असते फक्त अथक जिज्ञासा आणि विवेकबुद्धी वापरून विश्वाचे नियम जाणता येतील यावरचा विश्वास. अंतिम सत्याचा विज्ञानाला तिटकारा असतो. म्हणूनच अतिडाव्या आणि नवफॅसिस्ट या दोन्ही शक्तींना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वावडे असते. संदेह, वाद चर्चा, स्वतःची मते चूक असल्यास बदलण्याचा मोकळेपणा, या साऱ्यांना निरंकुशशाहीत स्थान नसते. सर्वोच्च महानेत्याचे शब्द देववाणी समजण्यात पाठीराख्यांना धन्यता वाटते.
कठीण उपाय अमलात आणायला राजकीय इच्छाशक्ती कमी असली की, जनतेचा रोष तज्ज्ञांवर वळवणे राजकारण्यांना सोपे जाते. पर्यावरणीय बदलांच्या जटिल समस्येवर सुचवलेल्या उपायांमुळे हितसंबंधांना धोका पोहोचलेला एक फार मोठा वर्ग पर्यावरणीय विज्ञानाच्या विरोधात कार्यरत आहे. (नुकत्याच पार पडलेल्या कॉप-28 या जागतिक परिषदेत या वर्गाच्या भूमिकेचे दर्शन झाले.) पृथ्वीचे हवामान बदलतच नाही, ते हवामान बदल मानवी कारणांमुळे होत नाहीत. या दोन्ही टोकांत पर्यावरण विज्ञानावर साशंकता निर्माण करणे हा धागा समान आहे. त्याचबरोबर वसाहतवाद आणि परकीय सत्तेमुळे पराभूत झालेल्या आणि त्यामुळे पूर्वेतिहासात अभिमानाच्या खुणा चिन्हे शोधणाऱ्या समाजांतही विज्ञानविरोध वाढताना दिसतो. राजकीय फायद्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा बळी देणे सोपे असते. वैज्ञानिकांचा राजकीय मतदारसंघ थोडाच कुठे असतो!
उत्क्रांतिवाद न शिकल्यामुळे नुकसान होते ते शेवटी विद्यार्थ्यांचेच. मानवाचे स्थान जीवसृष्टीतले परमोच्च नसून इतर प्रजातींसारखाच तो एक आहे, साऱ्या जीवसृष्टीशी तो जवळून निगडित आहे हे उत्क्रांतिवाद विद्यार्थ्यांना शिकणाऱ्या कळतेच, शिवाय पर्यावरणाचे महत्त्व, काळाची खोली, स्थितिशीलतेवर मात करणाऱ्या व्यवस्थांचे महत्त्वही अधोरेखित होते. वैश्विक नम्रता आणि जीवसृष्टीशी बंधुभाव यांपासून विद्यार्थ्यांना आपण वंचित करतो आणि जागतिक शैक्षणिक निकषांवर विद्यार्थ्यांची पातळी खाली आणतो.
वैज्ञानिक दृष्टिकोन नाकारणे ही काही फुकाची बुद्धिजीवी ऐष नव्हे. अन्नसुरक्षा, येणाऱ्या महामाऱ्या, मानवी अस्तित्वच पुसून टाकणाऱ्या पर्यावरण बदलांसारख्या आव्हानांचा मुकाबला करण्याचे महत्त्वाचे उपाय विज्ञान दाखवू शकते. विज्ञानाला नाकारणे म्हणजे ह्या उपलब्धींचा मार्ग रोखणे. वैज्ञानिकांचे स्थान घसरणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज न भासणे, आणि समाजमाध्यमांवरील अति सुलभीकरणामुळे प्रत्येक व्यक्ती स्वतःच कुठल्याही विषयात ‘तज्ज्ञ’ बनणे ही साखळी धोकादायक आहे. आणि त्यावर आजच्या मुलाखतीत तोडगा मिळाला नाही असे जाणवून मी थबकलो. चालता चालता मी नेकार नदीवरच्या पुलावर पोहोचलो होतो. पुलाच्या काठाला रेलून मी नदीकडे पाहू लागलो. नेहमी उजेडात या नदीला पाहण्याची सवय असल्यामुळे काळेशार पाणी पाहून मन चरकले.
पुलावर किती वेळ उभा होतो हे माहीत नाही, पण चढ्या आवाजातील बोलणे ऐकू आल्यावर मागे वळलो. आशियाई वंशाचा एक तरुण त्याच्या गौरवर्णीय साथीदाराशी तावातावाने बोलत होता. नेमका मुद्दा जरी कळला नाही, तरी त्यांची चर्चा आजच्या भाषणावरती होती हे उडतउडत ऐकू येणाऱ्या शब्दांतून कळले आणि मौज वाटली. त्या युवकांचा आवाज ओसरल्यावर माझे चित्तभ्रांत मन डॉकिन्स यांच्या मुलाखतीवर परतले. डॉकिन्स यांच्या विचारशैलीचे दर्शन झाले, त्यातून काय जाणवले ?
किमान तीन वेळा तरी डॉकिन्स यांनी विचारलेल्या प्रश्नावर ‘मला माहीत नाही’, हे उत्तर दिले होते. इस्राईल पॅलेस्टाइन मुद्यावर विचारले असता ‘मी त्या विषयातला तज्ज्ञ नाही’, असे सांगून एक खाजगी नागरिक म्हणूनच आपली भूमिका विशद केली होती. डाव्या आणि उजव्या शक्तींची विज्ञानविरोधाची उदाहरणे देऊन समतोल साधला होता. दोन-तीन वेळा तर प्रश्नकर्त्यालाच ‘तुमचे मत जाणून घ्यायला मला आवडेल’, असे म्हटले होते आणि एकदा ‘पुरावा पुढे आल्यास मत बदलेन’, अशी ग्वाही दिली होती. बुद्धिवादी घमेंड आणि अभिनिवेष प्रतीत न होता त्यांची वैचारिक नम्रता जाणवत होती.
एखाद्या विषयात तुटपुंजे ज्ञान असूनही त्या ज्ञानाच्या- खरे तर माहितीच्या आधारे त्या विषयात तज्ज्ञ असल्याचे वाटणे, याला मानसशास्त्रज्ञांनी ‘डनिंग क्रुगर परिणाम’ असे नाव दिले आहे. समाजमाध्यमांवरच्या अतोनात माहितीमुळे ज्यातील बहुतेक माहिती एक तर निखालस खोटी किंवा अर्धसत्य असते. लोकांना खरोखरच आपल्याला अनेक विषयांत चौफेर ज्ञान आहे असे वाटते आणि मग कुठल्याही विषयाची वरवरची माहिती चाळणे पुरेसे वाटून सखोल ज्ञान अनावश्यक वाटू लागते. या ज्ञानगंडाची वाढलेली विषवल्ली टोकाच्या असहिष्णुतेपासून ते बंदिस्त समाजाच्या उभारणीत आपण पाहत आहोत.
पण, डॉकिन्स यांच्यासारखा आघाडीचा शास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रसारक जर या व्याधींपासून दूर राहू शकतो, तर सर्वसामान्य व्यक्तींनाही हे का शक्य असू नये? घर्मेडीचे रूपांतर उद्दामपणात आणि उद्दामपणाचे स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना खऱ्याच आहे या भ्रमात होते. याउलट, वैचारिक नम्रतेची आयुष्यभर साथ असली तर नवीन आव्हानांना सामोरे जायची शक्ती मिळते आणि स्वतःचा सर्वांगीण विकास करायची संधी. म्हणूनच अथकपणे कार्यरत असलेल्या, लौकिकार्थी वयोवृद्ध असलेल्या पण वृत्तीने चिरतरुण असलेल्या 82 वर्षांच्या व्यक्तीला ऐकायला चार पिढ्यांचे आणि अनेक देशा-वंशांचे लोक कुडकुडत्या थंडीत रांग लावून हजर राहतात आणि मग भाषणावर हिरिरीने चर्चा करतात. त्या चर्चातून काहींना पुढच्या दिशा शोधायचे सामर्थ्य मिळणार असते, काहींना ज्ञानाची नवीन कवाडे उघडण्याचे बळ, तर काहींना स्वतःच्या मूल्यांशी नव्याने ओळख.
रात्र फार झाली होती आणि अजून बरेच चालायचे होते. नदीवर शेवटचा कटाक्ष टाकायला मी वळलो. रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशाचे पाण्यावरचे प्रतिबिंब आता प्रथमच जाणवले. तो लुकलुकता प्रकाश डोळ्यांत साठवत मी घरची वाट तुडवू लागलो.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना